लहान मुलांच्या हातात मोबाइल देणं कितपत चांगल?
लेखक : आपले नाव | दिनांक : 28 मे 2025
सांगायचं झालं तर कोरोना आणि लॉकडाऊन हे तर आयत कारणच मिळालं की, ऑनलाईन क्लाससाठी मोबाइल आवश्यक आहे वगैरे.....
जे येत्या काही वर्षात घडणारच होतं ते कोरोनामुळे घडत आहे. आधी मीही कमी वयात मुलांच्या हातात मोबाइल देण्याच्या विरुद्ध होतो, त्यांना यापासून जेवढ दुर ठेवता येईल तेवढ दूर ठेवावं असं मला वाटत होतं, त्याला कारणही तसच होतं…
जेव्हा मी एखाद्या लहान मुलाला मोबाइलसाठी रडताना पाहतो, त्याच्या पायी तहानभूक आणि आपलं बालपण विसरतांना पाहतो तेव्हा मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात.
एकदा शाळेतून आलो कि सूर्य मावळेपर्यंत खेळत राहायचं. संध्याकाळी थोडा अभ्यास झाला कि जेवण आणि मग झोप.
पण आजकाल मैदानी खेळ तर जवळजवळ बंदच झाले आहेत आणि त्याची जागा मोबाइलनी घेतली आहे. एकदाचा टीव्ही बरा आहे… बाहेर गेलो कि सोबत तरी नेता नाही येत, पण मोबाईल जाऊ तिथे सोबती असतो. यावरून माझा विचार अजूनच पक्का झाला की, लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यायला नको !
मग हळूच एक विचार माझ्या मनात डोकावला. “मी पण… आपल्या मुलाला / मुलीला न जाणता, न समजून घेता त्यांच्यावर आपला विचार, आपलं मत थोपवणाऱ्या पालकांसारखा तर नाही वागत आहे ?”
या विचाराने मला जागे केले..... आणि फक्त मत न मांडता, यावर उपाय शोधण्यास प्रेरीत केले.
मोबाइल आणि तंत्रज्ञान आजच्या काळात किती महत्वाचं आहे हे मी सांगणार नाही, कारण त्याबद्दल आपण खूपदा वाचलं आणि ऐकलं असणारच. त्यामुळे मोबाईल लहान मुलांना देणे चांगलं कि वाईट हा प्रश्नच उरात नाही, तर तो कसा हाताळायचा हा प्रश्न उद्भवतो आणि त्याबद्दलचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला.
या शोध मोहिमेत काही उदाहरणे ऐकल्यावर आणि पाहिल्यावर माझ्या असं निर्दशनास आलं की बहुतांश पालक आपल्या मुलाला, मोबाईल हा ‘मनोरंजनासाठी’ देतात नाकी एक ‘कल्याणकारी यंत्र’ म्हणून ! नंतर मोबाईल म्हणजे मनोरंजन, हीच भावना त्या छोट्या मेंदूमध्ये आपला व्याप वाढवत जाते आणि त्यावरूनच मग…. मोबाईल दिल्याशिवाय शांत नाही बसत, मोबाइल शिवाय जेवण नाही करत, मोबाइल नाही दिला तर मारतो / मारते..... अशी गाऱ्हाणे जन्म घेतात.
पण दुसरीकडे काही अशेपण घरं पाहायला मिळतात जिथे पालक आपला वेळ पुस्तक वाचण्यात आणि इतर कामात घालवतात. परिणामतः मुलांचा पण त्या गोष्टींकडे कल वाढतो आणि मोबाईलचा वापर फक्त गरजेपुरता मर्यादित राहतो.
वरील उदाहरणावरून आपल्या हे लक्षात आलेच असणार की गोष्टी एवढ्या कठीण पण नाहीत. कारण म्हणतात ना…. “लहान मुलं आपण जे बोलतो त्यापेक्षा आपण जे करतो, त्याचं अनुसरण करतात” आणि हाच या पूर्ण भारूडा मागचा आशय आहे !
तर मुलांनी मोबाइलला कसा वापरायला पाहिजे..... याचे उत्तर म्हणजे “आपण” ! स्वतः आपण त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवू यावर हे अवलंबून आहे.
आता तुम्हीच विचार करा की आपण मोबाईल ‘फक्त’ मनोरंजनासाठी वापरतो की कामासाठी..... नाहीतर मोबाइलमुळे जे स्वतः लाच विसरतील ते दुसऱ्यांना तरी कसे सांभाळणार !
आपल्या कृतीतून त्यांच्यात रुजवा की, मोबाईलच्या तीन इंचाच्या स्क्रीन बाहेरही खूप मोठं आणि सुंदर जग आहे.....